Type Here to Get Search Results !

वर्दीतील हुकुमशाही, दादागिरी नही चलेगी...




वर्दीतील हुकुमशाही, दादागिरी नही चलेगी...

              

            एका मुलीचा सासरी छळ होतो म्हणून ती मराठवाड्यातील एका शहरातून निघून पुणे शहरात येते. सासरच्या लोकांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवते आणि महिला आश्रमात दाखल होण्याच्या अगोदर एका रात्रीपुरती तीन मुलींकडे त्यांच्या खोलीवर राहण्यांची अनुमती मागते. त्या तीन मैत्रिणी तिला आपल्या खोलीवर एक रात्र ठेवून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती मुलगी निघून जाते.

      

पण या दोन दिवसापूर्वी घडलेल्या कहाणीचा खरा ट्वीस्ट असा आहे की मराठवाड्यातून आलेल्या आणि त्या तीन मुलींच्या घरी एक रात्र थांबलेल्या त्या मुलीचे सासरे माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत. त्यामुळे आपली ताकद वापरून काही पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन ते मराठवाड्याहून तडक पुणे येथे दाखल होतात.

त्या तीन मुलींच्या खोलीवर धाड घातली जाते .त्यांचे मोबाईल तपासले जातात त्यांच्या खोलीतील कपडे, अंर्तवस्त्र साऱ्याची तपासणी केली जाते कुठलेही वॉरंट नसताना बेकायदेशीरपणे त्या मुलींना कोथरूड पोलीस चौकीमध्ये आणले जाते. पाच तास तेथे त्यांना डांबून ठेवले जाते . जेथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही अशा खोलीमध्ये त्यांना बसवले जाते आणि त्यांचा कबुली जवाब घेतला जातो.

त्या तीन मुलींमधील एकजण नोकरीला गेलेली असते तर नोकरीच्या ठिकाणाहून तिला वॉरंट नसताना सर्वांच्या समक्ष पोलीस गाडीत बसवून पोलीस चौकीवर आणलं जातं.

यामुळे त्या मुलींचे घरमालक त्यांना ताबडतोब खोली खाली करा असा तगादा लावतात.

पोलीस चौकीवर नेल्यानंतर त्या मुलींना 

"तू महार मांगाची आहेस म्हणून असं वागतेस. तुम्ही रांडा आहात. " असं त्यांना कोथरूड पोलिस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील व संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, तसेच PSI अमोल कामटे ऐकवतात .

पुढील शब्दांमध्ये त्यांना धमकावले जाते ,

"तुम्ही महार मांगाचे असेच असता, तुझ्या रूमवर मुलं येतात, त्या सगळ्यांसोबत तू झोपत असशील, तुला माय बापाने टाकून दिलंय, तू उलट उत्तर देतेस- तुझा हा attitude आहे तर एक दिवस कुणीतरी तुझा मर्डर करेल- तू नीट जगूच शकणार नाही - तू असच मरशील, तुला करियर मध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल- तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, करिअर बरबाद होईल. "

   " तुम्हा मुलींचे स्कार्फ सारखे आहेत म्हणजे तुम्ही समलिंगी संबंधात आहात " असेही त्यांना ऐकवलं जातं.

      या मुलींना लाथा बुक्क्यांनी मारलं जातं. त्यांच्या मोबाईल मधील फोटो पाहून मोठ्यांनी व्हाट्सअप वरचे मेसेजेस वाचून गलिच्छ शब्दांमध्ये कमेंट केल्या जातात.

      या मुलींचा कसलाही गुन्हा नसताना हे सर्व घडलेल आहे.

ॲट्रॉसिटी खाली FIR नोंदवून घ्या असं वारंवार सांगूनही कृती केली जात नाही. आत्ता रात्रीचे १२ वाजे पर्यंत रात्रभर लढा सुरू होता. सकाळी साडेदहापासून पिडीत मुली आणि त्यांच्यासह समाजसेविका श्वेता पाटील आणि कार्यकर्ते कोथरूड पोलीस स्टेशनला बसून राहिलेले आहेत . अद्यापही FIR नोंदवला गेलेला नाही. 

एक सज्ञान महिला घरामधून निघून जाते आणि तीन सज्ञान महिलांच्या घरी त्यांच्या आणि स्वतःच्या मर्जीने एक रात्र राहते या सगळ्यांमध्ये कुठे गुन्हा घडलेला आहे ? आणि गुन्हा घडलेला नसताना त्यांना पोलीस चौकीमध्ये नेऊन जातीवाचक शिव्या आणि मारहाण केली हे निषेधार्ह आहे.

या पार्श्वभूमीवर शोषितांची एकजूट किती आवश्यक बनलेली आहे ते नव्याने सांगायला नको !

वर्दीतील बेकायदेशीर दादागिरी चालणार नाही. योग्य तपास करून गुन्हा नोंद केला पाहिजे. 



- संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड


Post a Comment

0 Comments