बिटू नावाचा व्यक्ती आज जग सोडून गेला सारं गाव हळहळलं....कोण होता बिट्या..सांगतो.
मी लहान होतो तेव्हा झोपड पट्टीत काही दिवस बिट्याच्या शेजारी असणाऱ्या घरात आमचं कुटुंब राहिचं.आई वडील,भाऊ बहीण व मी.शेजारी म्हणल्यावर ये जा असायची.गुळवे आडनाव असणारे कुटुंब निवृत्ती गुळवे नावाचे गृहस्त त्यांना आम्ही काका म्हणायचो.त्यांना एकुण पाच आपत्य चार मुलं एक मुलगी.थोरला बिट्या,दोन नंबर दादा,तीन नंबर उमा,चार नंबर बालु,पाच नंबर धनू....असं ते सर्वसाधारण मोलमजूरी करून जगणारे कुटुंब.पण माणसात मिळुन मिसळून राहणारे कुटुंब.निवृत्ती काका पाटलांच्यात सालाने काम करायचे.शरीर यष्टी पिळदार,डोक्यावर गुलाबी रेश्मी फेटा,अंगात पांढरा तीन गुंडी सदरा ,धोतर,पायात कातडी जोडा.उंची सहा फुट...चालताना जोडा करकर वाजायचा त्याला नाल ठोकलेली.पान तंबाखु खायची सवय.बिट्या मोठा पोरगा.पण थोडा स्वभावाने भोळसर.बोलताना तोतरा बोलायचा.तो पत्र्याच्या डब्ब्याची कावड करून हाॅटेलात पाणी भरायचा.तीन गुंड्याचा पांढरा सदरा नाड्याची पांढरी ढगळी पॅंट.धारदार लांब नाक,गोरा रंग ऊंची ही तसीच..तो हापस्याचे पाणी आणायचा.गावात हाॅटेलात पाणी भरायचा.पाणी भरल्याच्या बदल्यात त्याला चार पाच रूपये.बिस्कीट पुडा,पेडा द्यायचे.पोरगं आपल्या सोबत येऊन शेतात काम करू लागेल म्हणून त्याचे वडील त्याला शेतात नेहण्याचा प्रयत्न करायचे पण बिट्या काही जात नसे.वडील त्याला चामकाने मारायचे,नाल ठोकलेल्या जोड्याने मारायचे.अनेक वेळा बिट्याला मारताना मी बघितले होते.कारण तो आमच्या नेटावर.(सुतार,लोहार काम करण्याचे ठिकाण)बिट्या बसायचा. सतत मार डोक्याला लागल्यामुळे तो वेड्यासारखा वागू लागला.
डोक्यावर परिणाम झाला.ऐके काळी तो पिक्चरची गाणी तोंडाने शिळ घालत गाणे गुणगुणायचा तो बिट्या शिव्या देऊ लागला....छप्पनन..धीन धीन....करू लागला.त्याच्या अंगावरले पांढरे कपडे आता काळे कुट्ट दिसु लागले.अंगावर मातीचे स्थर चढू लागले.गोरा बिटृया काळा दिसु लागला.वडील वारले.दोन भाऊ पुण्याला गेले.गावात एक भोळसर भाऊ आई....अन् बिट्या...असा परिवार...गुलाब खंडागळे नावाचा डॅशिंग माणुस मुंबई एका चाळीचा मालक
तो गावाकडे आलेला.त्याला मुलबाळ नव्हते.त्याने बिट्याला जवळ केलं.पोटच्या मुलासारखं सांभाळलं.बायकोला सांगुन ठेवलं पोट भर त्याला भाकरी खाऊ घालायचं.कपडे धोवायचे.आंघोळ घालायची.एक नाही दोन नाही सहा सात वर्ष गुलाब खंडागळे यांनी बिट्याला सांभाळले.बिट्या त्याच्या घरी जायचा.आईने दिलेली भाकरी खायचा.गावात फिरायचा.आई रोजाने कामाला जायची...गुरूवारी बाजारादिवशी त्याला चिवडा,जिलबी,भजे खायला द्यायची.
बिट्या शिव्या द्यायचा पण शेवटी आई होती ती पोटच्या पोराला विसरली नव्हती ती काळजी घेत होती.
गुलाब खंडागळे अचानक मरण पावले.आणि तिथून पुढे बिट्याची हालत बिघडली.तो पैसे मागुन चहा पिऊ लागला.
तब्बल २१ वर्ष तो चहा पैसे मागुन पिला...अंगात साखरेचे प्रमाण वाढले.त्याच्या अंगावर दुखे पडली.तो खाजवून जखम वाढवायचा.त्या परिस्थीतीत आई त्याला सांभाळत होती.खंडागळे बाई ती पण सांभाळायची..त्याला भाकरी,चहा बिस्कीट द्यायची.लाॅक डाऊनच्या काळात त्याला आधार दिला तो खंडागळे बाई व आईने...किराणा दुकाणदार यांनी त्याला बिस्कीट पूडे द्यायचे पण तो खात नसे खंडागळेच्या घरासमोर टाकायचा.चहा पिण्याची सवय लागली होती.बिटृयाला पैसै कोणीही द्यायचे तो सगळ्याचा लाडका होता.मल्हारी लाटे मात्र त्याला जवळचा होता.लाटे त्याला दवाखान्यात नेहत असे.औषधे खाउ घालत असे.बिट्याच्या घरी नेहून आंघोळ घालण्यापासुन चांगले कपडे अंगावर चढवून बिट्याला तयार करण्याचे काम लाटे करत.बिट्या कुणाचे ऐकत नसे पण लाटेचे ऐकत असे.
खंडोबा मंदिराच्या समोर तो बसत असे.उन वारा पाण्याची त्याला फिकीर नव्हती.तिन्ही ऋतूची त्याला सवय होती.तो कधी आजारी पडला असे झाले नाही.
कोरोणा त्याने पळविला...मात्र आज तो खंडोबाच्या चरणी लीण झाला...मंदिराच्या जवळ खंडोबाच्या चरणी मरण पावला....बिट्याचे खरे नाव सुर्यकांत होते आज समजले.
लहान असल्यापासुन आजतागायत मी बिट्याला रोज बघत आलो.आज शेवटच्या क्षणी बघीतले.अगदी शांत डोळे मिटुन शांत मुद्रेत बिट्या कसा दिसत होता.लांबधारदार नाक डोक्यावर टोपी घातलेली.नेहमी सारखा तिन गुंड्याचा सदरा घातलेला.नाडीची पॅंट वर पांढरा मलमली कपडा टाकलेला.हार घातलेला.तो बिट्या वाटतच नव्हता सुर्य प्रकाशात....अकांत करत चाललेला तो सुर्यकांत निवृत्ती गुळवे होता.मला कधी काळी पप्या म्हणुन हाक मारणारा बिट्या.आज दहिफळवाशीयांना निरोप देत होता.कायमची आठवण ठेऊन....मंदिराच्या समोर कधी न दिसणारी सावली ठेऊन........बस्स...पुढे लिहावे वाटत नाही....अखेरचा सलाम....भावपुर्ण श्रध्दांजली....
तुझा पप्या...........
-योगराज पांचाळ दहिफळकर.

Post a Comment
0 Comments