Type Here to Get Search Results !

येडशी गाव कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

 येडशी गाव कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

येडशी (प्रतिनिधी): येडशी गावाच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि. 24 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

येडशी गावातील पाणीपुरवठा प्रश्नावर दि. 7 मे रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे तसेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामपंचायत व आंदोलनकर्त्यांसोबत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे आंदोलनकर्ते गजानन नलावडे यांनी पुन्हा स्मरणपत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येडशी गावाला तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा पाणीपुरवठा योजनेचा पर्याय व्यवहार्य असल्याचे सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक लाईट बिलाची पूर्तता करण्याचे तसेच लातूर रोडवरील काढून ठेवलेली पाईपलाईन तातडीने पुन्हा बसविण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले. गावातील टाक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरून पाईपलाईनची चाचणी घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीलाही देण्यात आल्या.

यावेळी तेलंगदरा पाईपलाईन दुरुस्तीबाबत चर्चा झाली. या कामासाठी १५ वा वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत स्तरावर खर्च करता येऊ शकतो, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच तेलंगदरा व तेरणा या दोन्ही योजनांमधून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद वित्त आयोगातून करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून चोराखळी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यास तेरणा योजनेवरील अवलंबित्व कमी होऊ शकते, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

दरम्यान, चोराखळी पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नासंदर्भात आमदार कैलास पाटील व गजानन नलावडे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. यावर मंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. तसेच हा विषय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मांडण्याची विनंती आमदार कैलास पाटील यांना करण्यात आली आहे.

पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गजानन नलावडे यांनी दिला.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, सरपंच सोनिया पवार, माजी उपसरपंच गजानन नलावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार, शिवसेना विभाग प्रमुख अशोकराव देशमुख, गणेश पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments