Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षणासाठी दहिफळमध्ये ‘शोले स्टाईल’ आंदोलन



मराठा आरक्षणासाठी दहिफळमध्ये ‘शोले स्टाईल’ आंदोलन

पाण्याच्या टाकीवर चढून सज्जन कोठावळे व माजी उपसरपंच बालाजी मते यांचा निर्धार

दहिफळ (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दहिफळ, ता. कळंब येथील सज्जन कोठावळे व माजी उपसरपंच बालाजी मते यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जोपर्यंत शासनाकडून मान्य होत नाहीत, तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली न उतरण्याचा निर्धार या दोघांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू असून, आंदोलनाला ‘शोले स्टाईल आंदोलन’ असे संबोधले जात आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडे केलेल्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

पाण्याच्या उंच टाकीवर चढून करण्यात येत असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. आंदोलनामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा ठाम निर्धार सज्जन कोठावळे व माजी उपसरपंच बालाजी मते यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments