शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
दहिफळमध्ये ४४ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान; रेणुका ब्लड सेंटरचा सहभाग
दहिफळ, प्रतिनिधी : शारदीय नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून दहिफळ येथील शारदीय नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी खंडोबा मंदिरात हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात एकूण ४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
धाराशिव येथील रेणुका ब्लड सेंटरच्या कर्मचारी यांनी रक्तदान करुन घेतले. नवरात्रोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना जीवनदान मिळावे, या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देत समितीने समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रेणुका ब्लड सेंटरचे कर्मचारी, शारदीय नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.धाराशिव स्टार न्युज.

Post a Comment
0 Comments