६१ ग्रामपंचायतीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चिती प्रक्रीया विशेष ग्रामसभेचे आयोजन
कळंब | प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चिती प्रक्रिया; 11 व 12 जून रोजी विशेष ग्रामसभा
राज्यातील सन 2024, 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कळंब तालुक्यातील एकूण 61 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, कळंब यांच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींमध्ये 11 जून व 12 जून 2026 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार असून, या ग्रामसभांमध्ये सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नियुक्त करण्यात आलेले प्राधिकृत अधिकारी व त्यांचे सहाय्यक यांच्या उपस्थितीत संबंधित गावांमध्ये आदेशात नमूद केलेल्या दिनांक, वेळ व ठिकाणी विशेष ग्रामसभा पार पडणार आहे.
तसेच, या विशेष ग्रामसभांची माहिती संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात व्यापक प्रमाणावर प्रसिद्ध करण्यात यावी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर सूचना लावण्यात याव्यात तसेच गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना माहिती देण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
याशिवाय, ग्रामपंचायत आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व प्राधिकृत अधिकारी व सहाय्यकांची आढावा बैठक 10 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पंचायत समिती सभागृह, कळंब येथे आयोजित करण्यात आली आहे.
कळंब तालुक्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेला उपस्थित राहून आरक्षण निश्चिती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
– ऑनलाइन धाराशिव न्यूज
#Kalamb #GramPanchayatElection2026 #ReservationDraw #SpecialGramSabha #Osmanabad #DharashivNews #LocalBodyElection #MaharashtraPolitics #GramPanchayatElection #KalambTaluka
Dio Dharashiv ऑनलाइन धाराशिव न्यूज चॅनल
Post a Comment
0 Comments