येडशी येथे पावसासाठी मुस्लिम बांधवांची विशेष नमाज व प्रार्थना
येडशी प्रतिनिधी - धाराशीव तालुक्यातील येडशी परिसरासह पंचक्रोशीत पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. पावसाअभावी कोमेजत चाललेली पिके वाचवण्यासाठी आणि दुष्काळी सावट दूर होऊन दमदार पाऊस पडावा, यासाठी येडशी येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने शुक्रवार (दि11) रोजी शेतात एकत्र येत 'नमाज-ए-इस्तिस्का' (पावसाची विशेष नमाज) अदा करण्यात आली.
यावेळी खुल्या वातावरणात शेतामध्ये ताडपत्री अंथरून समाजबांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. नमाजनंतर दोन्ही हात पसरून अल्लाहाच्या दरबारात रब्बी व खरीप हंगामातील पिकांच्या संरक्षणासाठी आणि सर्वदूर मुसळधार पाऊस पडण्यासाठी भावपूर्ण दुवा (प्रार्थना) मागण्यात आली. शेतकरी, कष्टकरी आणि मुक्या जनावरांवर ओढवलेले पाण्याचे संकट दूर व्हावे, अशी आर्त हाक यावेळी देण्यात आली.या विशेष नमाज व दुवा कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ, तरुण व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment
0 Comments