टाटा सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांची आढाळा शाळेस भेट
विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद; सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या
आढाळा, दि. ११ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : टाटा सोशल सायन्स कॉलेज, तुळजापूर येथील एम.एस.डब्ल्यू. (Master of Social Work) प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक तथा पर्याय संस्थेचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांची माहिती जाणून घेतली.
या प्रशिक्षणार्थींमध्ये दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ यांसह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आढाळा शाळेतील मुलांशी हिंदी व इंग्रजी भाषेत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच आपल्या-आपल्या राज्याची ऐतिहासिक, भौगोलिक व शैक्षणिक माहिती शालेय विद्यार्थ्यांना दिली.
विविध राज्यांतून आलेल्या एम.एस.डब्ल्यू. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांनी घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे आढाळा शाळेतील विद्यार्थ्यांना भारताच्या विविध भागांची माहिती घेण्याची प्रेरणा मिळाली. देशभर भ्रमंती करून भारताची विविधता जाणून घ्यावी तसेच आपल्यालाही उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करावे, असा संकल्प विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले. प्रसिद्ध शिवव्याख्याते महादेव खराटे यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी हिंदी व इंग्रजी भाषेत संवाद साधण्याचे उत्कृष्ट कार्य केले. सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक तुकाराम कराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवानंदा स्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक बलभीम राऊत यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता चौथीतील चि. सुभांशू खराटे याने हिंदी व इंग्रजी भाषेत पाहुण्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments