Type Here to Get Search Results !

आढाळा शाळेत १०७ विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप

 आढाळा शाळेत १०७ विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप

गणेशोत्सवाच्या निमित्ताने महादेव खराटे यांचा सामाजिक दातृत्वाचा प्रेरणादायी उपक्रम


कळंब : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव आणि आनंद नव्हे, तर “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सवही आहे. याच उदात्त भावनेतून कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे प्रसिद्ध शिवव्याख्याते, स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शनचे संचालक, स्वप्नपूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव तथा उपक्रमशील शिक्षक श्री. महादेव हरिकिशन खराटे यांनी शाळेतील तब्बल १०७ विद्यार्थ्यांना सुमारे ३० हजार रुपये किमतीचे स्पोर्ट ड्रेस स्वखर्चाने उपलब्ध करून दिले.


या स्पोर्ट ड्रेसचे वाटप कळंब पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष व अभ्यासू व्यक्तिमत्त्व विस्तार अधिकारी श्री. हनुमंत झांबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


यावेळी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, ग्रामविकास अधिकारी नवनाथ खाडे, शिक्षणप्रेमी नागरिक जयचंद वायसे, भगवानराव मिंड यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना श्री. हनुमंत झांबरे यांनी महादेव खराटे यांच्या दातृत्वाचे कौतुक करत “समाजातील दानशूर व्यक्तींनी शिक्षण प्रक्रियेला आर्थिक व सामाजिक सहकार्य देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य अधिक बळकट होते. देशहितासाठी अशा सामाजिक दातृत्वाची गरज आहे,” असे आवाहन केले.


विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि नव्या स्पोर्ट ड्रेसमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास हेच या उपक्रमाचे खरे समाधान असल्याची भावना महादेव खराटे यांनी व्यक्त केली. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या प्रेरणादायी सामाजिक दातृत्वाच्या उपक्रमाचे आढाळा परिसरातून कौतुक होत असून, “समाजासाठी काहीतरी देण्याची” भावना इतरांमध्येही निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव खराटे यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम कराळे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानंद स्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक बलभीम राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments