Type Here to Get Search Results !

धोकादायक विद्युत पोल झुकला; दुर्घटनेची भीती

 धोकादायक विद्युत पोल झुकला; दुर्घटनेची भीती

दहिफळ–गौर मुख्य वीजवाहिनीवरील पोल तातडीने सरळ करण्याची मागणी

दहिफळ (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील दहिफळ येथून गौरकडे जाणाऱ्या मुख्य विद्युत पुरवठा वाहिनीवरील एक वीजपोल धोकादायकरीत्या एका बाजूला झुकला आहे. गट क्रमांक ३४६ मध्ये शेतकरी अंगद मते व शंकर मते यांच्या शेताच्या बांधावर हा पोल उभा असून, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलचा खांब मोठ्या प्रमाणात एका बाजूला झुकलेला असून, त्यावरून मुख्य विद्युत वाहिनीच्या तारा गेलेल्या आहेत. पोल कोसळल्यास विद्युत वाहिन्या शेतात पडून जीवितहानी तसेच शेतीचे नुकसान होण्याचा धोका आहे. या परिसरात शेतकरी व नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने तातडीने या ठिकाणी पाहणी करणे आवश्यक आहे.

धोकादायक स्थितीत असलेल्या या पोलकडे संबंधित विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच झुकलेला पोल सरळ करून त्याची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments