विनोदी बादशहा म्हणून रंगभूमी गाजवणारे जेष्ठ नाट्यकलाकार- फुलचंद अप्पा काकडे
एक धावता मागोवा...
कळंब तालुक्यातील दहिफळ हे गाव नाटकामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध होते.१९७३साली नवतरुण गणेश मंडळाची स्थापना झाली.गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या संकल्पनेतून नाट्य मंडळाची स्थापना झाली.गणेश उत्सवाचे निमित्त साधून मनोरंजनासाठी नवतरुण गणेश नाट्य मंडळाची स्थापना केली.याच मंडळाच्या माध्यमातून शेकडो कलाकार घडले.नाटकात काम करणारा दिवसा शेतात काम करायचा रात्री नाटकाची तालीम करायचा.
नाटकाची खरी सुरुवात केली ती डॉ.नागोराव परितकर यांनी.
दहिफळ येथील फुलचंद आदिनाथ काकडे जेष्ठ नाट्यकलाकार आहेत.काकडे यांनी वयाच्या १६ व्या वर्षांपासून नाटकात काम करायला सुरुवात केली.नवतरुण गणेश नाट्य मंडळाच्या माध्यमातून जवळपास तीस ते चाळीस नाटकात विविध भुमिका साकारली आहे.ज्या काळात मनोरंजन म्हणून नाटकं सादरीकरण केले जात होती तेव्हा कलाकारांना किंमत होती.कलाकारांचे कौतुक होत होते.
नवतरुण गणेश नाट्य मंडळाचे आधारस्तंभ दिग्दर्शक स्व.चंद्रसेन आबा थोरात यांनी शेकडो कलाकार घडविले.नाटकाच्या तालमीत कडक शिस्त होती.जी भुमिका घेतली ती जीवंत साकारली पाहिजे.पाठांतर करणे बंधनकारक होते.तालमीत चुकला तर त्याला माफी नसे तर कधी पायतान पाठीवर बसेल हे सांगता येत नसे.
कलाकारांनी मेहनत घेऊन आपली भूमिका रंगभूमीवर गाजवली पाहिजे.असा अट्टाहास थोरात आबांचा होता.
जवळास शे दीडशे कलाकार आबांच्या मार्गदर्शनाखाली घडले.फुलचंद काकडे यांना नाटकात संधी चंद्रसेन आबांनी दिली.आमच्याकडून चांगली रंगीत तालीम घेतल्यामुळे आम्ही कलाकार घडलो.प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात बसले पाहिजे.त्यासाठी चांगली तयारी आबा करून घेत होते.असा दिग्दर्शक पुन्हा होणे नाही.असे काकडे म्हणतात.
पंचक्रोशीत दहिफळची नाटकं प्रसिद्ध होती.नाटकाचे प्रयोग गणेश उत्सव, शारदीय नवरात्र उत्सवात गावोगावी फिरून केले जात होते.दहिफळ गावातील शेकडो कलाकारांनी आपली भूमिका रंगभूमीवर सादर केली आहेत.त्याकाळी प्रसिद्धी माध्यमे नव्हती.ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो काढत होते ज्यांनी हौस म्हणून आठवण म्हणून फोटो काढले त्यांच्याकडेच फोटो उपलब्ध आहेत.फुलचंद काकडे यांनी विनोदी भूमिका साकारल्या, नोकर, मारवाडी,भट, शिपाई,ऋषी, महामुनीची भुमिका साकारली.विनोदी बोलण्याची सवय यामुळे त्यांच्या भुमिका गाजल्या.पोट धरून पब्लिक हसत होते.प्रत्येक वर्षी गणेश उत्सवात नाटकं केली जात होती.बाभुळगावचा जहागीरदार, इनामदाराची सुन,बालचिलीया,डाकु मानसिंग, मायेला मुकलेली माणसं, वहिनी माझी माय माऊली,राजा हरिश्चंद्र ,उघडले स्वर्गाचे द्वार,आईची माया, वारणेचा वाघ सारख्या नाटकात विनोदी भूमिका साकारल्या.प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
गावातील महादेवाच्या पारावर नाटकाचे प्रयोग होत असत.गणेश उत्सवात नाटकं बसवली जायची.सोंगाड्या म्हणून विनोदाचा बादशहा म्हणून काकडे यांनी रंगभूमी गाजवली.मोबाईल, टिव्ही मुळे नाटकाकडे प्रेक्षक वर्ग कमी झाला.नाटकात काम करणारे वयोवृद्ध झाले.पुढची नवी पिढी मोबाईल मध्ये गुंतली.एके काळी नाटकामुळे प्रसिद्ध असलेले गाव प्रसिद्धी झोतातून बाजूला गेले.
योगराज पांचाळ यांनी तेरणा काठची पोरं ही वेबसिरीज सुरू केली व नाट्यकलाकार यांची टिम नव्या रुपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली.हा हा म्हणता ही वेबसिरीज गाजली.फुलचंद काकडे, देवीदास भातलवंडे, वसंत मते, श्रीराम मते, सुधाकर मते,स्व. शिवाजी मते, प्रभाकर ढवळे, इस्माईल शेख, चंद्रकांत जोगदंड, गणेश मते,चाॅंद शेख, बालाजी भातलवंडे यांनी विविध भुमिका साकारल्या.
फुलचंद काकडे यांनी छगण ची भुमिका गाजवली.छगणशी वाकडं त्याची नदीवर वाकडं हा डायलॉग प्रसिद्ध झाला.
हा डायलॉग मालिकेत घेतला गेला.
आपल्या विनोदी भूमिकेतून काकडे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
तेरणा काठची पोरं,गावठी भानगड, टेन्शन घाला चुलीत या वेबसिरीजमध्ये फुलचंद काकडे यांनी भुमिका साकारल्या.काही कारणास्तव वेबसिरीज बंद पडली.परंतु हाडाचा कलाकार कधीच शांत बसु शकत नाही.मोबाईलवर व्हिडिओ काढून लहान रिल बनवून आपली कला काकडे सादर करतात.
प्रतिक्रिया-
वय झाले तरी कला व कलाकार कधी म्हातारी होत नाही.कला चिरतरुण असते.नव्या पिढीने ती जपायची असते.गावात नवीन कलाकारांची टिम तयार व्हावी अशी इच्छा काकडे यांची आहे.आमचं वय झाले आहे.नवीन पोरांनी पुढे यावे गावाचेचे नाव कलाक्षेत्रातून गाजवावे अशी अपेक्षा आहे.
-जेष्ठ नाट्यकलाकार फुलचंद काकडे दहिफळ
ता. कळंब जि. धाराशिव
-योगराज पांचाळ दहिफळकर

Post a Comment
0 Comments