Type Here to Get Search Results !

मोहा येथे गौरी-लक्ष्मी देखाव्यात आझाद मैदानातील आरक्षण आंदोलनाचे प्रतिबिंब


मोहा येथे गौरी-लक्ष्मी देखाव्यात आझाद मैदानातील आरक्षण आंदोलनाचे प्रतिबिंब

मोहा प्रतिनिधी:-

 मुंबई येथे संघर्ष योद्धा मा. मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून मोठा जनसमर्थन मिळत आहे. या लढ्याला पाठींबा देण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक देखील आपापल्या पद्धतीने सहभाग नोंदवत आहेत.

मोहा (ता. कळंब) येथील अमोल बाळासाहेब मडके यांच्या घरी गौरी-लक्ष्मीच्या देखाव्यामध्ये या आंदोलनाचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आरक्षण लढ्याचे प्रतिकात्मक (छायांकित प्रती) दृश्य साकारून समाजभावना जागृत करण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला. यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील, त्यांना मिळणारे लोकसमर्थन, तळ ठोकून बसलेले आंदोलक, तसेच गावागावातून पाठिंबा दर्शविणारे नागरिक अशा दृश्यांचे हुबेहूब दर्शन घडविण्यात आले.

गौरी-लक्ष्मीच्या उत्सवात परंपरेने विविध देखावे साकारले जातात. मात्र यंदा सामाजिक आणि न्याय्य हक्कांच्या लढ्याशी निगडीत विषय हाताळल्याने हा देखावा विशेष ठरला आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी या देखाव्याला भेट देऊन आंदोलनाबद्दल एकात्मता दर्शविली.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही प्रत्यक्ष मुंबईला जाऊन आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाही, पण या पद्धतीने समाजाच्या लढ्यात आम्ही आमचा ठसा उमटवत आहोत. आरक्षणाचा प्रश्न हा आपला हक्काचा आणि जीवन-मरणाचा आहे. त्यामुळे गावागावातून लोक मनापासून पाठीशी उभे राहत आहेत."

दरम्यान, राज्यभरातील अनेक भागांमध्ये सध्या आंदोलनाच्या विविध छटा दिसून येत असून गावागावातून मोर्चे, धरणे, आणि उपोषणाचे कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून "एक मराठा, लाख मराठा" या घोषणेने जनतेत उत्साह व एकात्मता दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments