#वेदनादाई
बापाला फासावर लटकलेला पाहिलेली त्याची लेक सांगते की “त्यांना सारखे पैशासाठी फोन यायचे, कर्जामुळे त्यांना खूप टेन्शन होतं, सुट्टी दिवशी आम्ही कधी रानात गेलो तर ते आमच्यासमोर रडायचे पण कुणाचं फोन येतेत सांगत नव्हते, ते सहन करायचे. मग त्यांनी सहन केलं केलं अन आज रानात फाशी घितली. आईला दिसल्यावर पप्पाला तिनं पळत जावून उचलून धरलं मग काकाबी आलं अन आजोबानं अडकित्त्याने त्यांच्या गळ्याची दोरी कापली. आता कुणाच्या गाडीचा आवाज ऐकला की वाटते पप्पाच आलेत.” असे सांगत सांगत ती रडायला लागली अन रडत रडत डोळ्यातून अश्रूंधारा ओघळत असताना शेवटी फक्त एवढंच म्हणाली की “जसं माझं पप्पा गेलं तसं कुणाचंच जावूनी.”
तिचे हे शब्द ऐकून अक्षरशः काळीज फाटून गेलं आणि तिचा शेवटचा शब्द खूप मनाला लागल्याने हे थरथरत्या हातांनी लिहितोय.
शेतकऱ्यांनो,
कोणतीच बँक कर्ज नाही फेडले म्हणून फाशी देत नाही, आपल्यापेक्षा हजारो कोटींची कर्ज घेतलेले नेते आणि उद्योगपतींकडे बघा. ऐकलं का त्यांनी कधी टोकाचे पाऊल उचललेलं. एखाद्या सावकाराने जरी सारखा तगादा लावला असेल तरी त्याला सरळ सांगा पैसे फेडणे होत नाही. काय करायचे ते कर. तो काय येवून तुमचा जीव घेणार नाही. अनामिक भीतीच्या ओझ्याखाली सोसून सोसून आपण स्वतःच स्वतःला मारून टाकतोय. कर्ज फेडणे होत नाही म्हणून मरणे हा उपाय नाही उलट लेकरा बाळांना असे वाऱ्यावर सोडून जाणे म्हणजे त्यांचे आयुष्य अजून कठीण करणे आणि त्यांना संकटाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. मायबाप शेतकऱ्यांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे “सगळं वाहून गेलं तरी जावू द्या पण कृपा करून आपल्या पश्चात लेकरांवर असे रक्ताळलेले अश्रू वाहू द्यायची वेळ आणू नका.”
सरकार,
गावगाड्यातला अल्पभुधारक शेतकरी किती कर्जाच्या विळख्यात अडकला आहे याची यापेक्षा जिवंत साक्ष दुसरी असू शकत नाही. मु.पो.कारी ता.बार्शी येथील स्व.शरद भागवत गंभीर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने शेवटी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होवो आणि या दुःखातून सावरण्याचे तिला बळ मिळो. 🥲
विशाल गरड
लोकव्याख्यानकार • २५ सप्टेंबर २०२५

Post a Comment
0 Comments