Type Here to Get Search Results !

अन् सात शहीद वीरांनी रचले स्वतःचे सरण विरात वीर दौडले एक साथ....... मराठवाडामुक्ती संग्राम दिन विशेष लेख.

 


अन् सात शहीद वीरांनी रचले स्वतःचे सरण


विरात वीर दौडले एक साथ.......

मराठवाडामुक्ती संग्राम दिन विशेष लेख.


कळंब तालुक्यातील गौर गावचा गौरवशाली इतिहास असुन मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते.यात गौर गावातील सात स्वातंत्र्य सैनिक हुतात्मे झाले. रझाकारांशी प्रतिकार करत असताना .सात वीर रझाकारांच्या हाती लागले.अंगात बंदुकीच्या गोळ्या घुसलेल्या होत्या.रक्तांने माखलेले शरीर याच अवस्थेत स्वतः चे सरण रचुन गावांसाठी आपले जीवन समर्पित करणारे, हुतात्मे स्विकारणारे सातवीरांनी इतिहास घडविला होता.१७ सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत असताना त्यांचे स्मरण व्हावे पुढील पिढीला इतिहास कळावा यासाठी हा शब्द प्रपंच....


तेरणा नदीच्या काठावर वसलेले छोटेसे गौर गाव.जिकडे तिकडे आनंदी वातावरणात सुख समाधानानी राहत असलेले गावकरी.निजामाच्या राजवटीत असलेले गाव.

याच गावात रोहिल्या नावाचा रझाकाराचा हस्तक व्यापारी म्हणून राहत होता.कपडे विकुन त्याने गावात बस्तान बसविले होते.उसनवारी पैसे देऊन त्याने लोकात विश्वास निर्माण केला होता.

गाव तसे श्रीमंत होते.चांगली शेतीबाडी,व्यापारी गाव.गावातील काडीनं काडीची खबर तो रोहिल्या रझाकाराच्या मोरक्याला देत असे.रझाकाराचे सैन्य या गावातून जात असे.त्यावेळी घरात घुसून लुटमार करीत होते.लुटमार करून घरे पेटविली जात होती.अनेक वेळा हे घडत होते.परंतू या विषयी आवाज उठवणार कोण.

गावातील काही तरुण एकत्र आले.रझाकारांना माहिती कोण देतो याचा शोध घेतला.रोहिल्या हस्तक असल्याचे कळाले.हा रोहिल्या कायमचाच संपवायचा निर्धार करून तरूणांनी कट रचला.चिंचोली कॅम्पमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचे ठरले.गावात काही तरूण मंडळी देखरेख करत होते.रोहिल्याच्या बारिक सारिक हालचालींवर लक्ष देत होते.कॅम्पवर असणाऱ्या माणसांना माहिती दिली जात होती.रामभाऊ गवळी,चत्रभुज पवार, रामभाऊ गुरव, बळीराम माळी, सोपान लंगडे, मुकुंद लंगडे, अंबादास कुलकर्णी, भानुदास लंगडे, रामलिंग कानडे,राम रुपदास, विठ्ठलराव पाटील, नारायण भाकरे,दशरथ लंगडे, काशीनाथ तेली, पांडुरंग धनगर या मंडळींनी गावाची रझाकारांच्या तावडीतून सुटका करायची या इराद्याने पुढाकार घेतला होता.

चिंचोली कॅम्पवर प्रशिक्षण घेऊन एका रात्री गावात येऊन रोहिल्याला संपवायचा या बेताने डावपेच आखला.मध्यरात्रीच्या सुमारास काही निवडक मंडळी रोहिल्या राहत असलेल्या ठिकाणी पोहचले.घराला वेढा दिला.तर चत्रभुज पवार हातात गावठी बाॅम्ब घेऊन खिडकीतुन घरात शिरले.रोहिल्या व त्याचा मुनीम घरात झोपलेले होते.चत्रभुज पवार यांनी बाॅम्ब पेटवला व काही क्षणात घराच्या बाहेर पडले.कसला तरी आवाज आला .या आवाजाने रोहिला जागा झाला.प्रसंग ओळखून तो खिडकीतून पळाला.हिकडे बाॅम्ब फुटला रोहिल्याचा मुनीम ठार झाला होता.रोहिल्या पळुन गेल्याचे लक्षात येताच गाव जागे व्हायच्या आत स्वातंत्र्य सैनिक गायब झाले.

रोहिल्याने रझाकारांच्या छावणीवर येऊन मोरक्याला सर्व घटना सांगितली.दुसऱ्या दिवशी रझाकारांच्या फौजेने गावाला वेढा दिला.कोण कोण रझाकारांच्या माणसाला मारायला टपलेत.याची गुप्त हेराकडून माहिती घेतली.गावातील पाटील, कुलकर्णी या कटात सामील असल्याचे कळाले होते.तर काही व्यक्तींची नावे समजली होती.गावातील सात लोकांना पकडण्यात आले.सकाळची वेळ होती.कोणी पुजा अर्चा करत होते, कोण शेन लोट करत होते.कोणी अंघोळ करत होते.आहे त्या अवस्थेत गावातील मारुती मंदिरासमोर सात लोकांना पकडून आणले होते.चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली.कोणी काही बोलत नव्हते,काही घडलेच नाही असे समजून ते गप्प होते.विठ्ठलराव पाटील यांना रझाकाराचा मोरक्या विचारत होता.आप गावके मुखीया हो बताव कोण कोण फितूर है.आपकी सजा माफ होगी बताव.विठ्ठलराव पाटील गप्प होते.काही सांगायला तयार नाहीत.हुजऱ्या चाबकाने फटारे मारु लागला.जीव गेला तरी बेहत्तर गावाला दगा द्यायचा नाही.गप्पगुमान विठ्ठल पाटील मार खात राहिले.

हुजऱ्या अंबादास कुलकर्णी कडे वळला बामण माणुस खरं बोलेल चाबकाच्या भितीने सगळं सांगेल या विचाराने हुजऱ्या म्हणाला.आप तो बम्मण हो झुठ नाही बोलोगे बताव कोण कोण फितूर है.देवाचं नाव घेत गप्प होते अंबादास कुलकर्णी.एक नाही दोन नाही भैरे असल्यागत,हुजऱ्या चिडला दोन फटकारे लगावले.अंग थरथरत होते.फटकारा अंगावर पडला होता.उघड्या अंगावर ओळ उमटले होते.जीव गेला तरी बेहत्तर पण गद्दारी करायची नाही.चाबकाचा मार खाल्ला पण तोंडातून शब्द बाहेर काढला नाही.

विठ्ठलराव पाटील, अंबादास कुलकर्णी,दशरथ लंगडे, पांडुरंग लंगडे, अंबादास माळी, रामभाऊ धनगर, पांडुरंग धनगर ह्या सात लोकांना रझाकारांच्या पोलिसांनी येरमाळा येथे चौकशी साठी घेऊन जातो म्हणून दाव्याने बांधून मधल्या पाऊल रस्त्याने पांदीने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर घेऊन आले.सात लोकांना विचारपूस केली.परंतू कोणीच काही सांगितले नाही.

गौर ,शेलगाव,दहिफळ शिवावर तीन्ही गावांना जोडणाऱ्या मार्गावर हे सात स्वातंत्र्य सैनिकांना आनले होते.बंदुकीचा धाक दाखवला तरी कोणी काही बोललं नाही.शेवटी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या.रक्तबभ्भाळ अवस्थेत त्या सात वीरांना जवळच असलेल्या शेतातील कडब्याची गंज ,त्या गंजीतील कडबा आणायला लावला.

एका ठिकाणी कडब्याचा ढीग केला.सात लोकांना पकडून समोर उभा करून बंदुकीच्या फैरी झडल्या अर्धी काची मरणावस्थेत असलेल्या त्या सात वीरांना कडब्यावर फेकण्यात आले व कडब्याच्या ढीगाला आग लावण्यात आली.पेटलेल्या ढिगाकडे बघत रझाकार सैन्य नाचत होते.मोठा विजय मिळवला अश्या तोऱ्यात ती रझाकारी पिल्लावळं आनंद व्यक्त करत निघुन गेली.लांब झाडाच्या आडोशाला उभे असलेले शेतकरी चिंतामणी जैन हे उघड्या डोळ्यांनी आपल्या शेतातील कडबा घेताना बघत होते.रझाकाराच्या भितीने लपून सारी घडलेली घटना डोळ्यात साठवत होते.रझाकार सैन्य गेल्यावर मोठ मोठ्या आरोळ्या ठोकून पळत सुटले गौरच्या दिशेने .गौरची काही माणसं पाठीमागून पाठलाग करत होती.मरणाच्या भितीने बऱ्याच अंतरावर थांबुन होती.चिंतामणी जैन यांची भेट झाली.घडलेला वृत्तांत कळला सारे गाव सुतकात पडले.रझाकारांच्या तावडीतून गावची सुटका करण्यासाठी सात वीर शहीद झाले.ते ही स्वतःचे सरण रचुन जीवन समर्पित केले.

या गावात हिंदू, मुस्लिम,सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.आपला व्यवसाय करत आहेत.नामाकिंत व्यक्ती या गावात घडले आहेत.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवला आहे,नौकरदार , व्यापारी यांनी परिपूर्ण असलेले हे गाव.याच गावात

आजही त्या शुरवीरांचे,धाडस, इतिहास सांगणारे हुत्माम्य स्मारक मोठ्या दिमाखात गौर येथे उभे आहे.

बलीदानाचे प्रतीक म्हणून......

वीरात वीर दौडले सात....म्हणत..

लेखक-योगराज पांचाळ दहिफळकर

मो.७७४१०६७९७३

Post a Comment

0 Comments