Type Here to Get Search Results !

ईडा पिढा टळुदे...बळीचं राज्य येऊदे.....शेतकऱ्यांच्या जिवनावर लेख

 


इतकी अतिवृष्टी होऊन सगळं आगात पाण्यात गेले.सत्ताधारी,विरोधक,दलाल मिडिया यांच्यामध्ये रणकंदन माजले. असे वाटले की पुराण कथेतील समुद्र मंथन चालू आहे. ज्याच्यात पाण्यात बुडालेल्या शेतकऱ्याला वरती आणायचे आहे. मिडिया नावाच्या पर्वताला आरोप प्रत्यारोपांच्या दोऱ्या बांधून देव आणि दानव यांनी मंथन केले (इथे देव कोण आणि दानव कोण हे ठरवण्याचे स्वातंत्र्य अबाधित आहे). आणि त्या मंथनातून आतापर्यंत तरी गुंठ्याला 65 रू किंमतीचा हिरा सापडला आहे.माणिक, मोती दिवाळीनंतर अपेक्षीत आहेत तोपर्यंत हिरा घेऊन नाचा म्हणजे कच्चूुन दिवाळी साजरी करा म्हणजे टॅक्स रूपाने तो हिरा स्वगृही पोहंच होईल. मार्केट ची,व्यापाऱ्यांची, मोठ मोठ्या कंपन्यांची ही देव, दानवाना काळजी आहे हे इथे दिसून येते.

तर असो पाण्यात बुडालेल्या शेतकऱ्याला, त्याच्या पुत्राला इतकेच सांगायचे आहे की तुझी झक मार आता तरी हातपाय हलव.सोयाबीनचे भाव 4000 हजाराच्या आत आहेत, कुठल्याच पिकाला किमान आधारभूत भाव (तोही देव दानवानी च ठरवलेला) मिळत नाही. जगणार कसा, प्रपंच भागणार कसा ? असा प्रश्न पडत असेल कधी,लाचारीचे, रांगेत उभे राहून भीक दिल्यागत मिळणारे अनुदान घ्यायचा कमीपणा वाटत असेल तर न्याय हक्कासाठी रस्त्यावर कोण उतरणार. शेतकरी म्हणून तुला स्वतःला सुधारेना आणि पोरगा 2 GB डाटा संपवल्याशिवाय वर पाहिणा.

साध ऊसाचं गणित करा रे भावांनो. जो ऊस गेल्यावर्षी 2800 रू टन विकला तो आता 2400 रुपयाने घेवू म्हणत आहेत कारखानदार. मजुरीत वाढ, खतात वाढ, तोड सोल वाहतुकीत वाढ आन तुमच्या उसाला 400 रू गेल्यावर्षी पेक्षा कमी.

पण याच्यात त्या कारखानदारांची तरी काय चूक आहे, बकरे कटाई ला नेत असतानाच अंदाज बांधते आपला शेवट आला म्हणून, कर्णकर्कश आवाजात ओरडायला चालू करते. पण इथे तुम्ही माणूस असून सुद्धा तुमच्या प्रपंचावर म्हणजेच तुमच्या जीवावर मोठा सुरा फिरत असताना तुम्ही फक्तं पाहत बसता. कुठवर भरणार आहात दुसऱ्यांची घरे. एकरी 50 टन उसाचे उत्पादन गृहीत धरले तरी 50*600रुपये केले तरी 30000 रू होतात. हेक्टर मध्ये हिशोब केला तर 75000 रू होतात. आणि त्याची तुलना सरकारच्या अनुदानाशी केल्यास गुंठ्याला 750 रू होतात. कोण समजून घेणार हे गणित. बरं जी मागणी करतोय आपण ती अवास्तव ही नाहीं उलट देव दानवानी काढलेल्या frp पेक्षा कमी आहे. जो की मूर्खपणा आहे,नुकसान आहे पण ते मागायला सुद्धा जर तुम्ही रस्त्यावर उतरणार नसाल तर अनाकलनीय आहे.3000 रुपयांच्या आत गुळपावडर वाले आणि 3500 रू च्या आत साखर वाले पहिल्या उचलीसाठी येता कामा नये ही भूमिका घेवून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

बरं पहिले पाच सात वर्षापूर्वी तुम्हाला आंदोलनात न उतरण्याची कारण होती की गाय म्हशी कोण सांभाळील, धाराचा, वैरण पाण्याची अडचण होती. आता तीही काळजी सरकार नावाच्या यंत्रणेने घेतली आहे. पाण्यापेक्षा दूध स्वस्त केले तीही उपाययोजना कमी पडली म्हणून तुमच्याकडून समजा 10 लिटर दूध घेतले तर स्वतः सरकार नावाच्या यंत्रणेने दूध संघवल्याना ते 10 लिटर दुधात 10 लिटर केमिकल मिसळून मार्केट मध्ये 20 लिटर दूध आणायला लावले. अर्थात त्या अतिरिक्त 10 लिटर दुधाचे पैसे ते आपसात वाटून घेतात की नाही हा आपला प्रश्न नक्कीच नाही. परिणामी तुम्ही गाई म्हशी विकून रिकामटेकडेच आहात.

त्यामुळे रस्त्यावर उतरून बोंब ठोकली तरी देव दानवांची चड्डी पिवळी होईल पण आवाज सुद्धा तितकाच मोठा हवा.

चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा असे म्हणणार नाही कारण शेळ्या मेंढ्यांच्या पंक्तीत बसून तुम्ही माझे 

तरी काय वाकडे करणार हा माझा ठाम विश्वास आहे.

✍️शरद शेळके

Post a Comment

0 Comments