१८ गायी, २३ शेळ्या, १०० कोंबड्या दगावल्या : ६० लाखांचे नुकसान
सर्वस्व गमावलेल्या दातखिळे कुटुंबाला बळ देणार
अतिवृष्टी आणि महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या भूम तालुक्यातील दातखिळे कुटुंबाला सर्वतोपरी बळ देण्याचा निर्धार आपण केला आहे. पावसामुळे बाणगंगा नदीला आलेल्या पुरात तेलगाव पिंपळगाव येथील श्रीराम दातखिळे (वय ५५) यांच्या १८ गायी, २३ शेळ्या,१०० कोंबड्या वाहून गेल्या. २३ सप्टेंबर रोजी आलेल्या या संकटाने दातखिळे कुटुंबीय़ांचे ६० लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. आपण दातखिळे कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. शासनाच्या विविध योजनांसह क्रॉउड फंडिंगच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या सहकार्याने दातखिळे आणि अशा सगळ्याच शेतकरी कुटुंबांना उभारी देण्याचा आपला प्रयत्न आहे.
मृत जनावरांसाठी शासकीय अनुदान व कर्जसवलती मिळवून देण्याचे, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि केंद्रपुरस्कृत इतर योजनांमधून मदत मिळवून देण्याचे अभिवचनही आपण यावेळी दिले. श्री दातखिळे यांच्या मुलाचे बी.फार्मसी पर्यंत शिक्षण झालेले आहे. तातडीने त्याला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती (PMEGP)व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (CMEGP) योजनेच्या माध्यमातून औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी मदत मिळवून देण्याबाबतही आपण प्रशासनाला निर्देश दिले आहेत. पुरामुळे खरवडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून जमीन दुरुस्त करून देण्यात येईल.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. जमिनी खरवडून गेल्या आहेत, फळबागा कोसळल्या आहेत, रोजगाराचे साधन असलेले पशुधन वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत या सर्व कुटुंबांना पुन्हा एकदा सक्षमपणे उभे करण्यासाठी राज्य सरकार सोबतच समाजातील संवेदनशील घटकांनीही पुढाकार घ्यायला हवा. आपण या सर्व कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे आहोत आणि शासनाच्या योजना तसेच समाजातून उत्स्फूर्तपणे पुढे आलेली सगळी मदत या सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन मदत मिळवून देण्याचे आपले प्रयत्न आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांसाठी फक्त शासकीय अनुदानावर अवलंबून राहून भागणार नाही. शासनाच्या योजनांसोबत समाजाच्या विविध घटकांचे सहकार्यही मोलाचे ठरणार आहे. क्राउड फंडिंग उभारून मोठया प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना थेट मदत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उभारी घेण्याची दातखिळे कुटुंबाची जिद्द प्रेरणादायी आहे. अशा प्रकारे जास्त नुकसान झालेल्या इतर कुटुंबांनाही या योजनांच्या माध्यमातून मदत पोहोचविण्याचे आपले विशेष प्रयत्न सुरू राहतील. दसऱ्याच्या दिवशी दिलेला हा दिलासा म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आशेचा किरण ठरला आहे. शासन व समाजाच्या संयुक्त प्रयत्नातून दातखिळे यांच्यासह अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले शेतकरी बांधवाचे कुटुंब पुन्हा स्वाभिमानाने उभे राहतील, असा विश्वास आहे.
#Dharashiv #Bhoom #Rain #Farmer #धाराशिव #अतिवृष्टी #भूम #पाऊस #शेतकरी

Post a Comment
0 Comments