गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ पत्रकारांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे गौरव
कळंब प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे कळंब पंचायत समितीच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार, माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी पर्यायी सामाजिक संस्थेचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तोडकर, पुणे येथील सिनियर रिपोर्टर अक्षय फाटक, पोलीस निरीक्षक विशाल जाधव, गटविकास अधिकारी सोपान अकेले, विभागीय सचिव सचिन शिवरक्ती, पोलीस निरीक्षक शकील शेख, जिल्हाध्यक्ष रहीम शेख, उद्योजक पी. जे. तांबारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडत प्रदीर्घ काळ पत्रकारिता करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सतीश टोणगे, बालाजी अडसूळ, मुस्तान मिर्झा, बाळासाहेब जाधवर, सुभाष घोडके, धनंजय घोगरे, माधवसिंग राजपूत आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच मयूर रुणवाल, विठ्ठल माने, जाफर शेख आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई सपाटे यांचाही गौरव करण्यात आला.
दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. तब्बल १८ वर्षे सैन्यदलात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत नगरपरिषद शाळेतील दहा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पत्रकारिता ही समाजातील प्रश्न मांडण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवसिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन जाफर शेख यांनी केले, तर आभार मुस्तान मिर्झा यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार, विद्यार्थी, पालक, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments